एप्रिल २००९ हा महिना मी कधीही विसरणार नाही. तो दिवस म्हणजे आदरणीय रतन टाटा आणि माझी संस्मरणीय भेट!

नॅनो ही लखखटिया गाडी लाँच होऊन फार तर एक आठवडा झाला असेल. सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला आलो आणि इमेल चेक करताना एक आमंत्रण आलेलं दिसलं. नीट वाचल्यावर समजलं की नॅनो गाडीसाठी पहिल्या दिवसापासून काम केलेल्या कोअर टीमसाठी टाटा मोटर्सने श्रमपरिहाराचे टाटा मोटर्स लेक हाऊस येथे आयोजन केले आहे. दुपारी नॅनो प्रोजेक्टचे मुख्य गिरीश वाघ ह्यांनी स्वतः आमंत्रण दिले आणि सगळ्या टीम साठी एक सरप्राईज असेल असं सांगितलं.

तो दिवस उजाडला आणि माझ्या सहकाऱ्यांबरोबर मी लेक हाऊसला पोहोचलो. लेक हाऊसच्या दारातून आत शिरतोय तोच “वेलकम बॉईज” असा आवाज आला आणि समोर बघतोय तर दस्तुरखुद्द रतन टाटा आमचे स्वागत करायला उभे होते. डोळ्यांवर, कानांवर विश्वास बसेना. त्यांनी आम्हाला शेक हँड केला आणि अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. त्यांची ती हसरी मूर्ती पाहून मनाला बराच दिलासा मिळाला पण तरीही आम्ही पूर्णपणे भांबावलेल्या अवस्थेत आत गेलो. कोणीही एकमेकांशी बोलण्याच्या अवस्थेत नव्हतो आणि आधीच आता आलेल्यांची साधारणपणे हिच अवस्था होती.

इतर सगळे लोक आल्यानंतर ते, गिरीश वाघ साहेब आणि रवी कांत साहेब आत आले. मग गिरीश वाघ साहेब प्रत्येक टीम मेंबरची ओळख करून देत होते. टाटा साहेब माझ्यापाशी आले आणि पुन्हा शेक हँड करून म्हणाले “Good job and thank you very much”. टाटा साहेबांचे ते शब्द अजूनही जसेच्या तसे कानात साठवलेले आहेत. मी डिजिटल मॅन्यूफॅक्चरिंग मध्ये काम करतो म्हंटल्यावर म्हणाले “We have a long way to go…”. आपण स्वप्नात तर नाही ना ह्याची चिमटे काढून पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली. ओळख परेड झाल्यावर नॅनो प्रोजेक्टचा एकूण प्रवास, त्यात आलेल्या अनेक अडचणी आणि त्यावर केलेली मात ह्यावर वरिष्ठांनी एक छान सादरीकरण केलं. नंतर टाटा साहेब बोलायला उभे राहिले आणि पुढच्या २० मिनिटांत त्यांनी फक्त सगळ्या टीमने केलेलं काम आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. टाटा साहेबांनी. “Keep the journey of  innovation going…always…” असा ‘आयुष्यभर जपावा’ असा सल्ला त्यांनी मला दिला.

भाषण संपल्यावर त्यांनी आमच्याबरोबर जेवण केलं आणि ग्रुप फोटो सेशन झालं.  एवढ्यात कोणीतरी एक सद्गृहस्थ काळजीने म्हणाले, “Please…साहेबांना आता काहीही त्रास देऊ नका. फोटो बास करा.” परंतु टाटा साहेब हसत हसत म्हणाले, “Let them take the photos and it’s their day…Let them enjoy”. किती ती विनम्रता. जणू काही त्यांच्या वेळेवर ह्या कर्मचार्यांचाच हक्क आहे अशी जाणीव त्यांनी करून दिली.

नॅनो प्रोजेक्ट म्हणजे प्रत्येक सामान्य इंजिनिरला, त्याच्या चौकटीच्या बाहेर विचार करायला लावून खंबीर आधार आणि प्रोत्साहन मिळालं तर त्याची झेप ही ‘गरुडझेप’ ठरू शकते ह्याचं एक उत्तम उदाहरण होतं.  टाटा साहेबांनी माझ्यासकट अनेक लोकांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा दिली. टाटा मूल्यांची जपणूक आणि टाटा कर्मचाऱ्यांमध्ये ती कशी रुजतील ह्याची काळजी त्यांनी आपल्या वागणुकीतून घेतली. टाटा कोड ऑफ कंडक्ट हे त्याचेच एक उदाहरण होय.

नंतरच्या काळात कंपनीला कोविडच्या निमित्ताने असेल किंवा बदलत्या काळात आर्थिक पातळीवर झालेला तोटा असेल अश्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण टाटा साहेबांनी कठीण काळात कंपनीसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या चांगल्या निर्णयाकडे पाहिलं की अंगात तानाजीचं बळ येतं. अश्या अडचणीच्या काळात अनेकांच्या आयुष्यात ते ‘दीपस्तंभ’ ठरले.

९ ऑक्टोबरला रतन टाटा गेल्याची बातमी ऐकून धस्स झालं. भारतीय उद्योग जगताचे ‘पितामह’ ज्यांना म्हणता येईल असं वादातीत व्यक्तिमत्व – तेजोमय नक्षत्रांचं आश्वासन – निखळून पडलं. कंपनीत त्यांचा फोटो सुंदर सजवलेल्या चबुतऱ्यावर ठेवला होता. आमच्या कला सागरने केलेल्या एका बॅनरवर ओळी होत्या;

“अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्,

मला ज्ञात मी एक धूलीकण

अलंकारण्याला परी पाय तूझे,

धुळीचेच आहे मला भूषण…..!”

दुसऱ्या दिवशी टाटा मोटर्स मधला JRD टाटांच्या पुतळ्याचा परिसर रतन टाटा साहेबांना साश्रुनयनांनी निरोप देण्याकरता तुडुंब भरला होता. नवे-जुने, सारी मंडळी, जागा मिळेल तिथे बराच वेळ उभी होती. ‘टाटा साहेब अमर रहे’च्या घोषात अनेक क्षेत्रांत स्वच्छंद संचार करणारा, तेजस्वी आणि मानवतेची मूल्ये खऱ्या अर्थाने जगणारा आगळा वेगळा ‘उद्योगमहर्षी’ अनंतात विलीन झाला; गगनात विसर्जित झाला. माझ्यात टाटा मूल्य रुजवणाऱ्या आणि ती आयुष्यभर जगणाऱ्या महामानवाला पाहून बराच वेळ मी आवरून धरलेला बांध फुटला.

मी फोटोला पुष्पहार वाहिला आणि शेवटी हारातली दोन सुटी फुलं घरी घेऊन आलो…आठवणी कायमच्याच जपून ठेवण्यासाठी!

Published by

Categories: